‘विंचुर्णीचे धडे’

‘विंचुर्णीचे धडे’ हे पुस्तक फक्त गावाकडच्या गोष्टींचे पुस्तक नाही तर एका स्त्रीच्या मुक्तछंदात जगलेल्या आयुष्याची गोष्ट आहे. फलटणजवळ छोट्या गावात निर्धास्त एकटे राहताना आलेल्या गौरी देशपांडे यांच्या रोजच्या अनुभवांची ही लेखमाला आहे.

विंचुर्णीच्या विंचवांचे अनुभव, मांजर कुत्रे पाळण्याची गोष्ट, पाझर तलाव, विंचूर्णीचा लहरी पाऊस आणि तितकीच लहरी मराविमची वीज यासोबत गोरख, नानी, मुकुल या माणसांच्या गोष्टीही पुस्तकात आहेत. गौरी देशपांडेंच्या सहज सुंदर लेखनशैलीमुळे वाचकांना त्यांच्याशी गप्पा मारल्यासारखे वाटेल.

गावात राहताना जाती भेद, स्त्री-पुरुष भेद, वेगवेगळ्या समजुती, शहरी संस्कृतीचा पोकळपणा, गावाकडची न बदलण्याची वृत्ती यावर कोणतीही टोकाची टीका न करता मध्येच सहज टाकलेला तिरकस कटाक्ष वाचताना हसू येते. शेवटी विंचुर्णी गावात राहण्यामुळे शिकायला मिळालेले धडे लेखिकेने दिले आहेत. त्यात आयुष्याचे ‘तत्त्वज्ञान’ करू नये हा मोलाचा धडा. कुठल्या अमुक एका घटनेने, वाक्याने, वागण्याने, भूत-वर्तमान-भविष्य सारे झाकोळून टाकायचे नाही. ‘आपली’ माणसे जोडत जायची. ज्यांनी ठोकर दिली ते ‘आपले’ कधी नव्हतेच असे म्हणून पुढे जायचे हा जगण्याचा तरीका गौरी देशपांडे सांगतात.

गौरी देशपांडेंची सर्वच पुस्तके संग्रही असावीत अशी असतात. हे थोड्या वेगळ्या धाटणीचे, हलके फुलके पण मार्मिक पुस्तक नक्की वाचावे असे.हे छोटेखानी पुस्तक सर्वत्र उपलब्ध.

समीक्षा – पुस्तक प्रवाह (@PustakPravah)

BUY

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started