पुस्तकं सांगतात गोष्ट📖
वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची,
माणसांची, आजची कालची उद्याची
एका एका क्षणाची.
झाड हिरव्या पानांनी सळसाळाव्या अश्या सुखाची
निष्पर्ण फांदीच्या एकाकी पणा सारख्या दुःखाची
वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलाची,
युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची
जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,
प्रेमाची, द्वेषाची श्वासाचीही
पुस्तकं सांगतात गोष्ट,
मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकात सांगितलेल्या?
पुस्तक काही सांगू इच्छितात…
तुमच्या सावलीत रांगु इच्छितात..
पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते
पुस्तकात हिरवंगार रान हलते
पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखवळपणा
पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना
पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस
काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस
पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे
सर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहे
पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबकम..
आयुष्य पथावरचा नवा कदम
मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी ?
छे हो वाट मुळीच अवघड नाही
रस्त्यावर चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो
तेवढ्या सहज पुस्तक वाचायची बस !
अहो वाचायला तर लागा म्हणजे पोहोचायला लागाल
ह्या त्या ठिकाणी.
पुस्तक काही सांगू इच्छितात
तुमच्या सावलीत रांगु इच्छितात…
-दासू वैद्य
(सफदर हश्मी यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)
